
पुणे, 03 जानेवारी (हिं.स.)। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना त्यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. “अजित पवारांनी ‘खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए’, असे हिंदीत म्हणतात. ते कोणत्या पक्षाबद्दल बोलत आहेत? नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल ते बोलत आहेत. खरं तर आरोप-प्रत्यारोप कसे करायचे, हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही आरोप करायला गेलो, तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. मी हे उत्तर दिले, एवढेच पुरेसे आहे; यानेच अजित पवारांचे पुस्तक बंद होईल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. अजित पवार यांनी महापालिकेतील भाजपच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला होता. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका कर्जाच्या खाईत कशी बुडाली, याचे उदाहरण देत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. “दहा हजार कोटींच्या ठेवींपैकी आठ हजार कोटी सत्ताधाऱ्यांनी मोडल्या. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष लाच घेताना पकडले गेले. कर्जरोखे काढून कोट्यवधींचे कर्ज घेण्यात आले,” असे गंभीर आरोप त्यांनी केले होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु