अलिबाग : कुटुंबाला वेठीस धरून १८ लाखांचा दरोडा
रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे मापगाव येथे मध्यरात्री भीषण दरोड्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ८ ते ९ अनोळखी इसमांनी एका कुटुंबाच्या घरात
चाकू-सुर्‍याच्या धाकाने कुटुंबाला वेठीस; १८ लाखांचा दरोडा


रायगड, 05 जानेवारी (हिं.स.)। अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे मापगाव येथे मध्यरात्री भीषण दरोड्याची घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ८ ते ९ अनोळखी इसमांनी एका कुटुंबाच्या घरात घुसून चाकू, सुरे व लोखंडी रॉडचा धाक दाखवत जबरी चोरी केली. या घटनेत आरोपींनी कुटुंबीयांना मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमक्या दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या हॉलमधील स्लायडिंग खिडकी उचकटून व लोखंडी ग्रिलचे लॉक तोडून आरोपी घरात घुसले. आरोपी मराठी व हिंदी भाषेत परस्परांशी बोलत असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. घरात शिरताच आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाचे हात बांधून तोंडाला सेलोटेप लावले व त्याला बळजबरीने घराच्या मागील बाजूस कंपाउंडबाहेर नेऊन ठार मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी व घरातील इतर सदस्यांना मारहाण केली.

फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून मारण्याची धमकी देत दोघांचे हातपाय बांधून तोंडाला सेलोटेप लावण्यात आली. त्यानंतर चाकू, सुरे व लोखंडी रॉडचा धाक दाखवत घरातून एकूण १८ लाख २२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ व दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(२), ३१०(५), ३११, १२७(२), १३७(२), ३५१(३) व १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande