

नवी दिल्ली, 05 जानेवारी (हिं.स.)। एनसीसी ही संस्था आत्मविश्वासपूर्ण आणि मूल्यनिष्ठ तरुण घडवत असून हे तरुण विकसित भारत@2047 चा कणा आहेत. असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी छात्र सेनेच्या 'एकता आणि शिस्त' या ब्रीदवाक्यावर प्रकाश टाकून केले.
उपराष्ट्रपती नवी दिल्ली येथील डीजीएनसीसी कॅम्पमध्ये आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिर 2026 च्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्र उभारणी आणि युवा विकासातील एनसीसीच्या निरंतर योगदानाबद्दल उपराष्ट्रपतींनी या संघटनेची प्रशंसा केली.
छात्रांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, उपराष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिन शिबिराचे वर्णन भारताचा आपल्या तरुणांवरील विश्वास तसेच एक मजबूत आणि एकसंध राष्ट्र घडवण्याच्या सामूहिक वचनबद्धतेचे एक शक्तिशाली प्रतीक असे केले.
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान एनसीसीच्या छात्रांनी दिलेल्या अनुकरणीय योगदानाचे स्मरण करून उपराष्ट्रपती म्हणाले की, सुमारे 72,000 छात्र-सैनिकांनी नागरी संरक्षण कर्तव्यांसाठी स्वयंसेवा केली. यातून त्यांनी गरजेच्या वेळी राष्ट्राची सेवा करण्याची वचनबद्धता, धैर्य आणि तत्परतेचे दर्शन घडवले.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिर हे न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानातील मूल्यांचे प्रतिबिंब आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील छात्र-सैनिक या शिबिरात एकत्र राहतात आणि प्रशिक्षण घेतात, त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना मूर्त रूप घेते, असे ते म्हणाले. साहसी उपक्रम, आंतरराष्ट्रीय युवा विनिमय कार्यक्रम, पर्यावरणीय उपक्रम आणि आपत्कालीन मदत कार्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी एनसीसीच्या छात्र-सैनिकांची प्रशंसा केली. केरळमधील वायनाड पुरादरम्यान छात्र सेनेने केलेल्या प्रशंसनीय सेवेचा उपराष्ट्रपतींनी विशेष उल्लेख केला.
सायबर आणि ड्रोन प्रशिक्षणाचा समावेश तसेच रिमोट पायलट प्रशिक्षण अकादमीची स्थापना यासह एनसीसी प्रशिक्षणाच्या आधुनिकीकरणाचे स्वागत करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, अशा उपक्रमांद्वारे तरुणांना उदयोन्मुख तांत्रिक आणि सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जाईल.
तत्पूर्वी, शिबिरात आगमन झाल्यावर, उपराष्ट्रपतींना एनसीसीच्या छात्रांनी मानवंदना दिली. त्यानंतर छात्रांनी सादर केलेला सांस्कृतिक कलाविष्कार पाहिला आणि त्यांच्याशी संवाद साधला, तसेच त्यांच्या शिस्त, उत्साह आणि राष्ट्राभिमानाच्या भावनेची प्रशंसा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule