
चंद्रपूर, 05 जानेवारी (हिं.स.)।
बहुचर्चित किडनी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याच्या तपासाला गती आली असून प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक डॉ. रवींद्रपाल सिंगच्या अंतरिम जामिनावर सुनावणी एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. दरम्यान आता मंगळवारी चंद्रपूर न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
किडनी प्रत्यारोपण प्रकरणात दिल्ली न्यायालयाने दिलेल्या ट्रांझिक्ट रिमांडनुसार दिल्लीतील डॉ. रवींद्रपाल सिंग
यांचा अंतरिम जामीन मंजूर झाल्यावर त्याची पुढील सुनावणी सोमवारी चंद्रपूर सत्र न्यायालयात रोजी होणार होती. पण त्यांच्याकडून वकील हजर न झाल्याने सुनावणी एक दिवसाने समोर ढकलण्यात आलेली आहे. परिणामी आता अंतरिम जामीनावर सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे.
एलसीबीकडून डॉ. रवींद्रपाल सिंग याच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे सादर करण्यात येणार असून, या सुनावणीकडे तपास यंत्रणेसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, विशेष तपास पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने किडनी पीडितांच्या यादीतील उत्तर प्रदेशातील एका पीडिताला शनिवारी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या पीडितावर २०२४ मध्ये तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी व डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी किडनी शस्त्रक्रिया केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी याआधी सोलापूर येथील डॉ. क्रिष्णा आणि हिमांशू भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. यात हिमांशू भारद्वाजची किडनी कंबोडियात न काढता त्रिची येथेच काढल्याचे उघड झाले होते. उत्तर प्रदेशातील पीडिताची किडनीही काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
किडनी रॅकेटमधील डॉ. क्रिष्णा व हिमांशू भारद्वाज यांचा साथीदार पॉल तसेच डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आली आहेत. तसेच कोलकाता येथील प्रयोगशाळेतील वैद्यकीय व रक्त तपासणीच्या कागदपत्रांसाठी एक विशेष पथक पाठविण्यात आले आहे. त्यांना कागदपत्रे मिळाल्यानंतर नेमक्या किती लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याबाबत माहिती पुढे येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव