
जळगाव , 06 जानेवारी (हिं.स.) | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केलीय. “जनतेचा विश्वासघात करणाऱ्या बंडखोरांना जनता कधीही थारा देणार नाही. विकासाच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांना यावेळी योग्य धडा शिकवला जाईल,” असा ठाम इशारा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस दिला.
जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगावमध्ये आले असून यावेळी मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला. यावेळी भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यापूर्वी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील एकजूट अधोरेखित केली. तसेच जळगावला पुढील पाच वर्षांत विकसित शहरांच्या श्रेणीत आणण्याचा संकल्प महायुतीने केला असून, त्यासाठी लागणारा सर्व निधी राज्य सरकार देईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना केली. तसेच बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार नाही, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
बंडखोरांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. घराणेशाही टाळण्याचा प्रयत्न केला, पण काही जागी तांत्रिक कारणांमुळे उमेदवार कायम ठेवावे लागले, असेही ते म्हणाले. जळगावकरांच्या आशीर्वादाने आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल आणि महापौरही महायुतीचाच असेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर