
जकार्ता, 06 जानेवारी (हिं.स.)।इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी प्रांतात मुसळधार पावसामुळे आलेल्या भीषण पुरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले की, अनेक दिवस सुरू असलेल्या मान्सून पावसानंतर सोमवारी सकाळी नद्यांना पूर आला.यानंतर चिखल, दगड आणि मलब्याने भरलेला प्रचंड प्रवाह सिआउ तागुलंदांग बियारो जिल्ह्यात घुसला. या वेगवान पाण्याच्या प्रवाहात अनेक लोक वाहून गेले आणि अनेक गावे पाण्याखाली गेली.
पोलीस आणि लष्कराच्या मदतीने आपत्कालीन बचाव पथके सिआउ बेटावरील सर्वाधिक प्रभावित चार गावांमध्ये पाठवण्यात आली. हे छोटे बेट सुलावेसी बेटाच्या उत्तरेकडील टोकापासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर आहे. मुहारी यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी रस्ते तुटल्याने आणि दळणवळण व्यवस्था खंडित झाल्याने मदतकार्य पोहोचवण्यात अडचणी आल्या. त्यांनी पुढे सांगितले की, टेकड्यांवरून आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे सात घरे पूर्णपणे वाहून गेली, तर 140 हून अधिक घरे नुकसानग्रस्त झाली. पुरामुळे 680 पेक्षा जास्त लोकांना चर्च आणि सार्वजनिक इमारतींमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला.
हवामानात सुधारणा झाल्यानंतर आणि पुराचे पाणी ओसरल्यानंतर मंगळवारी बचाव पथकांनी 16 मृतदेह बाहेर काढले. उत्तर सुलावेसी शोध व बचाव कार्यालयाचे प्रवक्ते नूरियादियन गुमेलेंग यांनी सांगितले की, पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या भागांमध्ये आणखी तीन बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू आहे.
सिटारो जिल्ह्याच्या प्रमुख चिंतिया इंग्रिड कालांगित यांनी सोमवारी पुढील 14 दिवसांसाठी आपत्काल जाहीर केला आहे, जेणेकरून मदत साहित्य पोहोचवणे, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि पायाभूत सुविधांची दुरुस्ती जलदगतीने करता येईल. या पुरामध्ये 25 जण जखमीही झाले आहेत. कालांगित यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुढील काळात आणखी पाऊस पडल्यास पुन्हा पूर किंवा भूस्खलनाचा धोका वाढू शकतो, असा इशाराही दिला आहे. त्यांनी सांगितले की, प्रांतीय सरकारकडून जड यंत्रसामग्री आणि मदत साहित्य पाठवण्यात आले आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात इंडोनेशियाच्या सर्वात मोठ्या सुमात्रा बेटावर आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामुळे 52 शहरे आणि जिल्हे प्रभावित झाले होते. या आपत्तींमध्ये आतापर्यंत 1,178 जणांचा मृत्यू झाला असून, 7,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि मंगळवारपर्यंत 148 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode