उस्मान हादीच्या समर्थनार्थ ढाकामध्ये एकदिवसीय रॅली
ढाका , 06 जानेवारी (हिं.स.)।विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मंगळवारी ढाक्यात त्यांच्या पक्षाकडून एकदिवसीय रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीदरम्यान बांग्लादेशमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांचे वर्क परमिट रद्द
उस्मान हादीच्या समर्थनार्थ ढाकामध्ये एकदिवसीय रॅली


ढाका , 06 जानेवारी (हिं.स.)।विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मंगळवारी ढाक्यात त्यांच्या पक्षाकडून एकदिवसीय रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीदरम्यान बांग्लादेशमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांचे वर्क परमिट रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली.

मीडिया रिपोर्टनुसार, “न्यायासाठी मोर्चा” सकाळी सुमारे 11.30 वाजता शाहबाग येथून सुरू झाला. यामोर्चामध्ये कार्यकर्ते 10 पिकअप व्हॅनमधून तसेच पायी सहभागी झाले होते. हा मोर्चा सायन्स लॅब, मोहम्मदपूर, मीरपूर-10, उत्तरा, बसुंधरा, बड्डा, रामपुरा आणि जात्राबारी अशा अनेक प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करून सायंकाळी पुन्हा शाहबाग येथे परतला.

निदर्शकांनी सांगितले की, या आंदोलनाचा उद्देश हादी यांच्या हत्येच्या तपासात होत असलेल्या “प्रगतीच्या अभावाकडे” लक्ष वेधणे हा आहे. तसेच खुनी, कट रचणारे, त्यांचे सहकारी आणि त्यांना आश्रय देणारे अशा सर्व संबंधितांना 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी न्यायालयात उभे केले जावे, अशी मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान निदर्शकांनी “आम्ही हादीचे रक्त वाया जाऊ देणार नाही”, “माझा भाऊ कबरीत आहे, मग खुनी मोकळा का आहे?” आणि “लाल-हिरवा झेंडा, इन्कलाबचा झेंडा – तुम्हाला हादी दिसतोय का?” अशा घोषणा दिल्या. अहवालानुसार, निदर्शकांनी लष्करी गुप्तचर महासंचालनालयामधील कथित फॅसिस्ट सहकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करून न्यायासमोर उभे करण्याचीही मागणी केली.

उल्लेखनीय बाब म्हणजे, 32 वर्षीय शरीफ उस्मान हादी हे एक प्रमुख युवा नेते होते. जुलै–ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या जनआंदोलनांदरम्यान ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. या आंदोलनांमुळे शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले होते. 12 डिसेंबर रोजी ढाक्यात एका निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. येत्या 12 फेब्रुवारीला होणाऱ्या संसदीय निवडणुकांमध्ये ते उमेदवारही होते. उपचारासाठी त्यांना सिंगापूरला नेण्यात आले होते, मात्र 18 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande