पीव्हीसी आधार कार्डच्या शुल्कात वाढ; आता ७५ रुपयांत मिळणार
नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.)। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार पीव्हीसी कार्ड बनवण्याच्या शुल्कात वाढ केली आहे. आतापर्यंत ५० रुपये असलेले हे शुल्क १ जानेवारी २०२६ पासून ७५ रुपये करण्यात आले आहे. साहित्य, छपाई आणि सुरक्षित वितरणा
PVC Aadhaar card


नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.)। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार पीव्हीसी कार्ड बनवण्याच्या शुल्कात वाढ केली आहे. आतापर्यंत ५० रुपये असलेले हे शुल्क १ जानेवारी २०२६ पासून ७५ रुपये करण्यात आले आहे. साहित्य, छपाई आणि सुरक्षित वितरणाचा खर्च वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यूआयडीएआय कडून देण्यात आली आहे.

आधार पीव्हीसी कार्ड हे आधार कार्डचे अधिक टिकाऊ आणि सोयीचे स्वरूप आहे. हे दिसायला एटीएम किंवा डेबिट कार्डसारखे असून सहज वॉलेटमध्ये ठेवता येते. पॉलीविनाइल क्लोराईड (पीव्हीसी) पासून तयार केलेले असल्याने ते पाणी, वाकणे किंवा झीज होण्यापासून सुरक्षित राहते. या कार्डमध्ये सुरक्षित क्यूआर कोड, होलोग्राम, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्टसारखी अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

पीव्हीसी आधार कार्ड बनवण्यासाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येतो. वेबसाइटवर आधार क्रमांक आणि कॅप्चा भरल्यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर येणारा ओटीपी टाकावा लागतो.

त्यानंतर ‘Order Aadhaar PVC Card’ या पर्यायावर क्लिक करून माहिती तपासून पुढे जावे लागते. पुढील टप्प्यात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे ७५ रुपयांचे शुल्क भरावे लागते. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होते. यूआयडीएआय पाच दिवसांच्या आत आधार पीव्हीसी कार्ड छापून ते भारतीय टपाल विभागाकडे सुपूर्द करते आणि स्पीड पोस्टद्वारे ते थेट नागरिकांच्या पत्त्यावर पोहोचवले जाते.

ऑनलाइन प्रक्रिया शक्य नसेल तर नागरिकांना ऑफलाइन पर्यायही उपलब्ध आहे. यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नवीन पीव्हीसी आधार कार्ड मिळवता येते.

सध्या आधार कार्ड तीन स्वरूपांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये आधार लेटर, ई-आधार आणि पीव्हीसी कार्ड यांचा समावेश आहे. यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे की बाजारात खासगीरित्या बनवले जाणारे पीव्हीसी आधार कार्ड वैध मानले जाणार नाहीत. अधिकृत यूआयडीएआय मार्फत मिळणारे पीव्हीसी कार्डच सुरक्षित आणि मान्य असल्याचेही प्राधिकरणाने पुन्हा अधोरेखित केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande