
मुंबई, 06 जानेवारी (हिं.स.)। वारी एनर्जीज लिमिटेडची उपकंपनी आणि भारतातील ऊर्जा साठवणूक क्षेत्रातील एक प्रमुख घटक असलेल्या वारी एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने (डब्ल्यूईएसएसपीएल) आज फॅमिली ऑफिसेस, उच्च संपत्ती असलेले व्यक्ती (एचएनआयs) आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसह धोरणात्मक गुंतवणूकदारांच्या समूहाकडून, सुमारे 1,003 कोटी रुपयांच्या मोठ्या निधी उभारणीची फेरी यशस्वीपणे पूर्ण झाल्याची घोषणा केली.
हा निधी म्हणजे 20 गिगावॅट-तास क्षमतेचा प्रगत लिथियम-आयन सेल आणि बॅटरी पॅक उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी घोषित केलेल्या सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा एक भाग आहे, ज्यामुळे डब्ल्यूईएसएसपीएल कंपनी भारताच्या ऊर्जा साठवणूक यंत्रणेत आघाडीवर येईल. यामुळे देशाच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि ऊर्जा सुरक्षा उद्दिष्टांना भक्कम पाठबळ मिळेल.
युटिलिटी-स्केल स्टोरेज सिस्टीम, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि वितरित ऊर्जा ॲप्लिकेशन्ससाठी तयार केलेल्या उच्च-कार्यक्षमतेच्या सेल्स आणि बॅटरी पॅकच्या उत्पादनावर हा प्रकल्प लक्ष केंद्रित करेल. कार्यक्षेत्राचा हा विस्तार वारी ग्रुपच्या एकात्मिक नवीकरणीय उत्पादन रोडमॅपमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच सध्याच्या सौर उत्पादन क्षमतांसाठी एक धोरणात्मकदृष्ट्या पूरक बाब आहे.
या गुंतवणुकीमुळे, वारी ग्रुप सौर मॉड्यूल्स, इन्व्हर्टर, बॅटरी, ऊर्जा साठवणूक प्रणाली आणि उदयोन्मुख स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासह एक पूर्णपणे एकात्मिक ऊर्जा संक्रमण कंपनी म्हणून वेगाने विकसित होत आहे. यातच आता स्टोरेज उत्पादन क्षेत्राचा समावेश झाल्याने ग्रिड स्थिरता, नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर आणि मोठ्या प्रमाणावरील डीकार्बनायझेशनसाठी महत्त्वाचे असलेले सगळे उपाय पुरवण्याची वारीची क्षमता अधिक मजबूत झाली आहे.
या निधी उभारणीबाबत डब्ल्यूईएसएसपीएलचे संचालक अंकित दोशी म्हणाले: “जागतिक दर्जाचे ऊर्जा साठवणूक उत्पादन केंद्र भारतात उभारण्याच्या आमच्या दृष्टिकोनावर गुंतवणूकदार समुदायाने दाखवलेला विश्वास ही यशस्वी निधी उभारणी अधोरेखित करते. या धोरणात्मक साधनांच्या मदतीने, आम्ही आमच्या 20 गिगावॉट-तास क्षमतेच्या सेल आणि बॅटरी पॅक सुविधेचे कार्यान्वयन वेगाने करू, देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करू आणि भारताच्या ऊर्जा साठवणूक क्षमतेच्या वाढीस हातभार लावू. हा उपक्रम केवळ राष्ट्रीय शाश्वत ऊर्जा ध्येयांनाच पाठिंबा देत नाही, तर साठवणूक क्षेत्रात स्थानिक उत्पादन, रोजगार आणि तांत्रिक नवोपक्रमालाही चालना देतो.”
ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञानामध्ये देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या धोरणात्मक उद्दिष्टपूर्तीमध्ये हा 20 गिगावॅट-तास क्षमतेचा सेल आणि बॅटरी पॅक निर्मिती प्रकल्प म्हणजे एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule