
अमरावती, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासन आणि प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर संतप्त पालक, शिक्षण समिती आणि युवा प्रतिनिधींनी शाळेलाच कुलूप ठोकले. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच असल्याने वायगाव येथे हा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असतील, तर त्याचा उपयोग काय, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, शिक्षकांच्या अभावामुळे त्यांच्या शिक्षणावरच गदा येत असेल, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी वारंवार विनंती करूनही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अखेर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेऊन शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला. या कृतीतून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या जिल्हा परिषद शाळा प्रशासकीय दुर्लक्ष आणि धोरणहीन कारभारामुळे संकटात सापडल्याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. वायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची गंभीर कमतरता निर्माण झाली असून, वारंवार मागण्या करूनही शिक्षण विभागाने याकडे डोळेझाक केली. अखेर प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीला वैतागून संतप्त पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावातील युवा प्रतिनिधींनी आज आक्रमक पवित्रा घेत शाळेला थेट कुलूप ठोकले. या धडक आंदोलनामुळे शिक्षण वर्तुळात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.नेमकी काय आहे समस्या?वायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगली आहे. परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून येथे आवश्यकतेनुसार पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. मोजक्या शिक्षकांवर पूर्ण शाळेचा आणि सर्व वर्गांचा ताण पडत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे पाहून पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.
पाठपुरावा करूनही प्रशासनाची टाळाटाळ!
शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता.शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने व अर्ज देण्यात आले.संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची गांभीर्यता पटवून देण्यात आली.मात्र, प्रशासनाने प्रत्येक वेळी केवळ पोकळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली. प्रत्यक्षात एकाही नवीन शिक्षकाची नियुक्ती केली नाही.
आरपारची लढाई: अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला
प्रशासनाचा हा आडमुठेपणा आणि उदासीनता पाहून ग्रामस्थांचा संयम अखेर सुटला. आज सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळीच संतप्त पालक, शिक्षण समितीचे सदस्य आणि युवा प्रतिनिधी शाळेसमोर एकत्र आले. त्यांनी शिक्षण विभागाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत शाळेच्या मुख्य दरवाजाला कुलूप ठोकले.आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळ खेळणे बंद करा! जोपर्यंत शाळेत पूर्णवेळ शिक्षक येत नाहीत, तोपर्यंत कुलूप काढले जाणार नाही, असा ठाम इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी