बीड : श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव रविवारपासून
बीड, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। केवळ अंबाजोगाई करांचेच नव्हे तर राज्यातील समस्त भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव रविवारी (दि.११) पासून घटस्थापनेने सुरू होत आहे. या महोत्सवात नऊ दिवस किर्तन, भजन
Q


बीड, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। केवळ अंबाजोगाई करांचेच नव्हे तर राज्यातील समस्त भाविकांचे श्रद्धास्थान व कोकणस्थांची कुलदेवता असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव रविवारी (दि.११) पासून घटस्थापनेने सुरू होत आहे. या महोत्सवात नऊ दिवस किर्तन, भजन, प्रवचन व सुगम शास्त्रीय संगीताची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

अश्विन प्रतिपदेला रविवारी सकाळी १० वाजता श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात तहसीलदार तथा देवल समितीचे अध्यक्ष विलास तरंगे यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना केली जाईल. घटस्थापनेनंतर नऊ दिवस विविध शादोत्सवाचे भजन, कीर्तन, प्रवचन व संगीताचे कार्यक्रम होतील. दररोज सायंकाळी राज्यातील नामांकित गायकांचे सुगम व शास्त्रीय गायन होणार असल्याची माहिती देवल समितीचे सचिव गिरधारीलाल भराडिया यांनी दिली. या दसरा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून येणाऱ्या सर्व भाविकांना सुरळीत दर्शन घेण्यासाठी सोय करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या वाहनासाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची सोय करण्यात आलेली आहे.

नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव

दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत विविध स्थानिक भजनी मंडळांच्या भजनाचे कार्यक्रम होतील. रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ओंकार प्रभूघाटे व रात्री ८ ते १० असावरी देगलुरकर यांचे सुश्राव्य गायन होईल. सोमवारी सायंकाळी भाग्यश्री देशपांडे व ज्ञानेश्वरी गाडगे यांचे गायन होईल. मंगळवारी सायंकाळी श्रुती बोरगावकर व दीपिका भिडे यांचे सुश्राव्य गायन होईल. बुधवारी सायंकाळी ५ ते साडेसात यावेळेत श्रीधर फडके यांचे गीत रामायण व मधुवंती बोरगावकर यांचे सुश्राव्य गायन होईल. गुरुवारी रात्री ८ ते १० यावेळेत अर्चना कान्हेरे यांचे गायन होईल. शुक्रवारी जयंत केजकर व कृष्णा बोंगाणे यांचे गायन होईल. शनिवारी रेवा नातू व भाग्यश्री टिकले यांचे गायन होईल. रविवारी पंडित श्रीपाद लिंबेकर व मुग्धा गावकर यांचे गायन होईल. याशिवाय शहरासह स्थानिक कलावंतांचे गायन , प्रवचनाचे कार्यक्रम होतील.

पूर्णाहुती व श्रीची पालखी मिरवणूक

अश्विन शुध्द आष्टमी व नवमीला सोमवारी सकाळी ८ वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारात होमहवन होऊन सव्वा अकरा वाजता पूर्णाहुती पडेल. मंगळवारी दुपारी एक वाजता दसऱ्यानिमित्त योगेश्वरीची पालखी मिरवणूक सिमोल्लंघनासाठी नियोजित मार्गाने निघणार आहे. या दसरा व नवरात्र महोत्सवातील कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवल समितीच्या विश्वस्तांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande