अमरावती - श्रीनिवास पांढरे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे नवे प्रशासक
अमरावती, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सहाकराचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आजपासून प्रशासकराज सुरु झाले, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) श्रीनिवास पांढरे यांची जिल्हा बॅंकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आ
श्रीनिवास पांढरे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे नवे प्रशासक


अमरावती, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सहाकराचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आजपासून प्रशासकराज सुरु झाले, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) श्रीनिवास पांढरे यांची जिल्हा बॅंकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था ) गौतम वर्धन यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्हा बॅंकेवरील प्रशासक नियुक्तीबाबतच्या तर्क-वितर्कांना अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपुष्टात आला. मुदत संपल्यामुळे बॅंकेवर प्रशासकांची नियुक्ती होते की विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ दिली जाते, याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. सत्ताधारी संचालकांकडून मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली, मात्र न्यायालयाकडून ही याचिका फेटाळणयात आल्याने बॅंकेवर प्रशासकांची नियुक्ती होणार एवढे निश्चित झाले होते, अखेर विभागीय सहनिबंधक श्रीनिवास पांढरे यांची जिल्हा बॅंकेच्या प्रशासकपदी वर्णी लागल्याने जिल्हा बॅंकेतील आमदार बच्चू कडू व उपाध्यक्ष तसेच सहकार नेते अभिजीत ढेपे यांचे पर्व संपुष्टात आले आहे.

वर्चस्वाची लढाई

अद्याप बॅंकेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरलेला नसला तरी आतापासूनच विद्यमान संचालकांकडून पॅनेल गठन तसेच इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सहकारातील राजकारण तापण्याचे संकेत आहेत. जिल्हा बॅंकेवर वर्चस्वासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी केली जात आहे.

आता संघर्ष बॅंकेबाहेर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमदार बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजीत ढेपे विरोधात बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या गटात बराच काळ संघर्ष पहायला मिळाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर संधी मिळेल तेव्हा कुरघोडी करण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांची असलेली जिल्हा बॅंक सहकार आणि राजकीय नेत्यांसाठी मोकळे मैदान झाले होते, मात्र आता बॅंकेवरील सत्ताधारी राजवट संपुष्टात आल्यानंतर आणि प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये बॅंकेबाहेर म्हणजेच आता थेट निवडणुकीच्या मैदानात संघर्ष पहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande