
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत मतदानाची तयारी; मतदारांची अंतिम संख्या उद्या होणार जाहीर
अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण ८१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविलेल्या मतदान केंद्रांच्या प्रस्तावाला आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेतील मतदानाच्या तयारीला वेग आला आहे.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ही मतदान केंद्रे असतील. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी या केंद्रांवर शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे ३२ हजार शिक्षक मतदार पात्र असल्याचा अंदाज आहे. मात्र, मतदारांची अंतिम संख्या सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे.
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २५ केंद्रे
निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या मतदान केंद्रांच्या जिल्हानिहाय संख्येनुसार अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक २५ केंद्रे असतील. अकोला जिल्ह्यात १३, बुलढाणा जिल्ह्यात १८, वाशिम जिल्ह्यात ७, तर यवतमाळ जिल्ह्यात १८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. अशा प्रकारे संपूर्ण विभागात ८१ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्र निश्चित करताना मतदारांना सहजपणे मतदान करता यावे, यासाठी अंतराचे निकष विचारात घेण्यात आले आहेत. एका मतदान केंद्रावर किमान १५० मतदार असावेत, तसेच दोन मतदान केंद्रांमधील अंतर १४ किलोमीटरपेक्षा अधिक नसावे, असे सूत्र ठेवण्यात आले आहे. या निकषांच्या आधारे मतदान केंद्रांचा प्रस्ताव तयार करून आयोगाकडे पाठविण्यात आला होता.
लोकशाही भवनात होणार मतमोजणी
या निवडणुकीची मतमोजणी अमरावतीतील विद्यापीठ रोड परिसरातील लोकशाही भवन येथे होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे काम सुरू असून, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली जात आहे. मतमोजणी प्रक्रियेचा सराव म्हणून चालू आठवड्यात रंगीत तालीमही आयोजित करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या सहमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्राचा दाखला देत विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी मतदान केंद्रांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. आता मतदारांची अंतिम संख्या जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या पुढील नियोजनाला अधिक स्पष्टता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी