
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करणे तसेच उपलब्ध निकृष्ट चारा सकस करून जनावरांना खाऊ घालणे शक्य व्हावे, यासाठी वसमत तालुक्यातील कुरुंदवाडी येथे चारा साक्षरता अभियानांतर्गत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पशुवैद्यकीय चिकित्सालय, कुरुंदा यांच्या वतीने या प्रशिक्षणात गावातील २४ पशुपालक सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणादरम्यान सोयाबीनच्या कुटारावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे आणि तो जनावरांना सकस चारा म्हणून खाऊ घालण्याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. दुष्काळाच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करून जनावरांचे पोषण कसे करावे, याबाबतही पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, हिंगोली यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पशुपालकांमध्ये चारा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis