
पहिला दिवस रविवारी असल्याने सकाळ पासून मंदिरात भाविकांची गर्दी
अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। विदर्भाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी संस्थानच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात घटस्थापना, ध्वजारोहण, अभिषेक, प्रवचन, भजन, कीर्तन, सप्तशती पाठ, नवचंडी यज्ञ आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवासाठी दोन्ही मंदिरांत भाविकांच्या स्वागताची आणि दर्शन व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.श्री अंबादेवी मंदिरात रविवारी पहाटे ४.३० वाजता सहस्रधारा महाभिषेक करण्यात आला त्यानंतर संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात आली सकाळी ८.३० वाजता डॉ. जयंत पांढरीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नवरात्रोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थानच्या वतीने गेल्या ४५ वर्षांपासून अखंड सुरू असलेली प्रवचनमाला. ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सचिन देव महाराज यांचे 'श्री गुरूचरित्र माहात्म्य व श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचे चरित्र' या विषयावर प्रवचन होणार आहे. अंबादेवी मंदिरात दररोज सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय भजन, कीर्तन आणि श्री सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी