
* पिकांच्या नुकसानीची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर होणार
* पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य संबंधित घटकांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांना 26 सप्टेंबर 2026 रोजी दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. आता ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ च्या आधारे आणखी 39 तालुक्यांचा नव्याने समावेश केल्याने एकूण 304 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत.
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये १२ उपाययोजना व सवलती
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने १२ विविध उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनांनाचा लाभ नव्याने समावेश करण्यात आलेल्या ३९ तालुक्यांना देखील लागू होणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी यांचा समावेश आहे.
तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे अधिकाधिक सुरू करण्यासाठी निकषांमध्ये शिथिलता आणणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावांतील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांसाठी अन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे आणि पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पिकांच्या नुकसानीची मदत स्वतंत्र निर्णयाद्वारे
अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या ३०४ तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जीपीएस कोऑर्डिनेट संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तातडीने सादर करण्यात येणार आहे.
पिकांच्या नुकसानीबाबत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून, दुष्काळग्रस्त भागातील पाणी, चारा, रोजगार आणि शेतीसंबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.
दुष्काळ जाहीर झालेले जिल्हानिहाय तालुके
पालघर- जव्हार, मोखाडा, तलासरी
रायगड- श्रीवर्धन
रत्नागिरी- रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, लांजा, मंडणगड, खेड
सिंधुदुर्ग- सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला
नाशिक- मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड
धुळे- धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर
जळगाव- एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदुरबार- अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
अहिल्यानगर- अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता
पुणे- भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, आंबेगाव, जुन्नर
सोलापूर- उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
सांगली- मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, शिराळा, वाळवा, खानापूर, तासगाव, कडेगाव, पलूस
सातारा- सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, कराड
कोल्हापूर- पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड, शाहूवाडी, शिरोळ
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
जालना- बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
बीड- बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
लातूर- लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट
धाराशिव- धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा
नांदेड- नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव, मुदखेड, मुखेड
परभणी- पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
हिंगोली- हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
बुलढाणा- जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
अमरावती- अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरूड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर
अकोला- अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी
वाशिम- वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा
यवतमाळ- यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव
वर्धा- वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी, कारंजा
नागपूर- नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
भंडारा- भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी, तुमसर
गोंदिया- तिरोडा, आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव
चंद्रपूर-चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर
गडचिरोली- गडचिरोली, चामोर्शी (दोन)
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी