जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा - पंकजा मुंडे
बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। दुष्काळाच्या काळात पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची गरज आहे.त्यामुळे जातिधर्माच्या भिंत
भगवान गड


बीड, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। दुष्काळाच्या काळात पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची गरज आहे.त्यामुळे जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा अशी भावनिक हाक ना. पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन दिली. संत भगवानबाबा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या परंपरेच्या दसरा मेळाव्यात आठरापगड जातीतील भक्ती-शक्तीचा एकजीव 'कुंभमेळा' आणि जनसागराचे 'विराटरूप दर्शन भगवान भक्तीगडावरुन झाले.

सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर आज मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी उर्जादायी मार्गदर्शन केले. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर भाष्य केले. त्याचबरोबर सामाजिक सलोखा, जाती भेदरहित एकजूट, आणि जेन -जी च्या प्रमुख मुद्द्यांवर पंकजाताईंनी आपल्या खास शैलीत मांडणी केली. यावेळी व्यासपीठावर ना. पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आर्यमान पालवे, ॲड. यशश्रीताई मुंडे, ना. मेघनाताई बोर्डीकर ,माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, आ.मोनिका राजळे आ. निमित्त मुंदडा, आ.रत्नाकर गुट्टे, माजी खासदार सुजय विखे, माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार , माजीआ.केशवराव आंधळे, माजी आमदार भीमराव धोंडे, प्रा. लक्ष्मण हाके,ॲड. मंगेश ससाने, ह भ प राधाताई सानप, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते. पंकजाताईंचे सहपरिवार हेलिकॉप्टरने भगवान भक्तीगडावर आगमन झाले. हेलिपॅड ते सभास्थळापर्यंत त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. जेसीबीने फुलांची उधळण करण्यात आली. ध्यान मंदिरात संत भगवान बाबा यांचे पूजन व आरती करण्यात आली. सभेचे प्रस्ताविक डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केले तर यावेळी महादेव जानकर ,डॉ. सुजय विखे, धनंजय मुंडे यांची समयोचित भाषणे झाली.

*जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा*

---------------------

सध्याची दुष्काळी परिस्थिती गंभीर होणार आहे. येणाऱ्या काळात गावागावांत पिण्याचे पाणी पोहोचविणे, पशुधनासाठी चारा उपलब्ध करणे आणि शेतकऱ्यांना अनुदान व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दुष्काळाच्या काळात जातिधर्माच्या भिंती बाजूला ठेवून एकजुटीने संकटाचा सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्याची आपली भूमिका आहे.‘तुमच्याकडे पाणी नसेल तर मीही कमी पाणी पिईन. तुमच्या दुःखात सहभागी होऊन ते कमी करण्यासाठी प्रयत्न करीन,’ असे सांगत त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याची ग्वाही पंकजाताई मुंडे यांनी दिली.

*शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड मजुरांसाठी माझे जीवन समर्पित*

-------------------

राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे आशीर्वाद, गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आणि जनतेचे प्रेम हीच आपली ताकद आहे. शेतकरी,कामगार आणि ऊसतोड मजूर यांच्या प्रश्नांसाठी आपले नेतृत्व आणि आयुष्य समर्पित आहे. दुष्काळाच्या काळात रोजगार हमीच्या कामांकडे पाठ फिरवू नका, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधींचा लाभ घ्या.नदी संवर्धन आणि जलसंधारणाच्या कामांसाठी पुढाकार घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

*समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा*

-------------------

संत भगवान बाबांच्या पवित्र भूमीतून व्यसनमुक्तीचा संदेश दिला तेंव्हा तंबाखू आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा तुम्ही निर्धार केला. स्री भ्रुणहत्या असो की अन्य सामाजिक विषय यावर आपण भगवान भक्तीगडावरुन संकल्प केला.हे संकल्प तुम्ही एकजूटीने पार पाडले. समाजाच्या प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा, चांगले संस्कार आणि देशभक्तीची भावना आवश्यक असुन त्यादृष्टीनेच आपण वाटचाल करावी असे आवाहन त्यांनी केले.

*तुम्ही माझी आण बाण शान राखली*

----‐---------------

ना. पंकजाताई मुंडे यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे साहेबांवर जनतेने केलेले प्रेम आणि त्यांच्या पश्चातही समर्थकांनी जपलेले नाते याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मुंडे साहेबांच्या जाण्याचे दुःख मनात कायम असून, समर्थकांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्यांच्या भावना आपण मनात जपून ठेवू, असे त्यांनी सांगितले. भगवान भक्तीगडावरील दसरा मेळावा आपल्या नावाने ओळखला जातो, याचा अभिमान वाटतो. हा इतिहास जनतेच्या प्रेमामुळेच घडला आहे. उन्हाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मान राखला. तुम्ही माझी आण बाण शान राखली यासाठी माझ्या कातड्याचे जोडे करुन घातले तरी हे ऋण फिटणार नाही असे त्यांनी सांगितले.

*सामाजिक समता आणि देशभक्तीचा संदेश*

---------------------

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला पंकजाताई यांनी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गौरव केला. विविध समाजघटकांनी केलेल्या स्वागताबद्दल आभार मानत सामाजिक सलोखा आणि समतेचे आवाहन केले. युवकांमध्ये देशभक्ती, राष्ट्राविषयी आदर आणि सकारात्मक विचार रुजण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनांपेक्षा विधायक कार्यातून देशाच्या प्रगतीत योगदान देण्यावर भर दिला. प्रशिक्षित, सक्षम आणि स्पष्ट विचारसरणीचे नेतृत्वच समाजाला योग्य दिशा देऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

*माझ्या शेतकऱ्याचे रान भिजू दे*

-------------------

शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळावे, जनावरांची तहान भागावी आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे अशी नवरात्रातील उपवास आणि देवीच्या चरणी प्रार्थना आपण केली. अंधश्रद्धेवर आपला विश्वास नाही पण काही तरी चमत्कार घडावा आणि शेतकऱ्यांचे रान भिजावे हीच भगवानबाबां प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande