उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत लातूर जिल्ह्यात स्वराज्य गणेश मंडळाचा प्रथम क्रमांक
लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। उत्सव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ आहे, हे अहमदपूर येथील स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. गेल्या
स्वराज्य गणेश मंडळ


लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

उत्सव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजप्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचे प्रभावी व्यासपीठ आहे, हे अहमदपूर येथील स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. गेल्या १८ वर्षांपासून निःस्वार्थपणे सामाजिक कार्याचा वसा जपणाऱ्या या मंडळाने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’मध्ये लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून अहमदपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे मंडळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते मंडळाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंडळाला सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

समाजाच्या वास्तवाचे दर्शन घडविणारे देखावे

स्वराज्य गणेश मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ आकर्षक देखावे सादर करण्यावर भर न देता समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती, त्यांच्यासमोरील संकटे आणि जगावे की मरावे, अशा विवंचनेत सापडलेल्या बळीराजाची व्यथा जिवंत देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आली. या सादरीकरणातून शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि त्यांच्या संघर्षाची जाणीव समाजाला करून देण्यात आली.

मोबाईलचे वाढते व्यसन, ‘आपली बाजारपेठ, आपला अभिमान’, गडकिल्ल्यांचे संवर्धन, भोंदूगिरीचा पर्दाफाश, प्रशासनातील कर्तव्यदक्षता, कर्तृत्ववान नेतृत्वाला अभिवादन आणि नीट परीक्षेच्या आयोजनाबाबत उपस्थित झालेले प्रश्न अशा विविध विषयांवरील देखाव्यांतून सामाजिक प्रश्नांवर चिंतन करण्यास नागरिकांना प्रवृत्त करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या सादरीकरणातूनही आदरभाव व्यक्त करण्यात आला.

लोककला आणि शिवकालीन मर्दानी खेळांचा जागर

आधुनिकतेच्या प्रवाहात पारंपरिक कला आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्नही मंडळाने केला. केरळमधील पारंपरिक ढोलवादन आणि कथकली नृत्याचे सादरीकरण हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अतीत येथील श्री छावा युवा मंचाच्या तलवारबाजी पथकाने शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

या उपक्रमांतून भारतीय परंपरा, लोककला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेची ओळख नव्या पिढीला करून देण्यात आली.

डीजेला फाटा; टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक

कानठळ्या बसविणाऱ्या डीजे संस्कृतीला फाटा देत मंडळाने टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात शिस्तबद्ध मिरवणूक काढली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या मिरवणुकीतून पारंपरिक वारकरी संस्कृतीचा जागर करण्यात आला. ध्वनिप्रदूषणाला आळा घालत भक्ती, शिस्त आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवून आणण्याचा आदर्श मंडळाने निर्माण केला.

पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि शैक्षणिक प्रबोधन

पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना, व्यसनमुक्ती अभियान आणि विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक तणाव कमी करण्यासाठी राबविण्यात आलेले प्रबोधनात्मक उपक्रम यांमुळे मंडळाच्या कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande