
अमरावती, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। नवरात्रोत्सवामुळे बाजारात नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अधिक होत आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५ ते १० टक्क्यांनी दर कमी आहेत. घटस्थापनेपासूनच नारळाच्या खरेदीला वेग आला असून, दसरा आणि दिवाळीपर्यंत ही मागणी कायम राहणार असल्याची माहिती नारळाचे घाऊक व्यापारी दीपक बोरा यांनी दिली.
नवरात्रात अनेक भाविक देवीला नवस बोलतात, तर काही जण नवसपूर्तीसाठी नारळ अर्पण करतात. त्यामुळे या काळात नारळाच्या विक्रीत लक्षणीय वाढ होते. मार्केट यार्डातील बाजारात दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक होत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांतून नारळ दाखल होत आहेत. मागणी वाढलेली असली, तरी बाजारातील आवक समाधानकारक असल्यामुळे दरवाढीचा मोठा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळेल. महाराष्ट्रात दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि सणासुदीच्या खरेदीमुळे नारळ बाजारात उलाढाल वाढण्याची अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. मागणी आणि पुरवठ्याचे सध्याचे संतुलन कायम राहिल्यास ग्राहकांना दराच्या बाबतीत दिलासा मिळेल.
घाऊक बाजारातील शेकड्याचे दर
नवा नारळ २३०० ते २६०० रुपये
पालकोल २७०० ते २८०० रुपये
मद्रास ४२०० ते ४४०० रुपये
सापसोल ३२०० ते ४७०० रुपये
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी