
अमरावती, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरी नवीन नाही. भाऊ-बहिणीचे, नणंद-भावजयीचे निवडणुकीच्या रिंगणातील सामने यापुर्वी अनेकवेळा दिसले आहेत. पण, अमरावतीत वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजपने तिकीट नाकारले म्हणून राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे-बोंडे यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. डॉ. अनिल बोंडे हे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा प्रचार करताना दिसत असले, तरी त्यांच्या पत्नी डॉ. वसुधा बोंडे या मात्र सक्रीयपणे संगीता शिंदे यांच्या प्रचारासाठी समोर आल्या आहेत.
संगीता शिंदे यांच्या प्रचारार्थ येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित सहविचार सभेत व्यासपीठावर डॉ. वसुधा बोंडे या उपस्थित होत्या. त्यांचा उल्लेख करताना संगीता शिंदे म्हणाल्या, भावजय म्हटली की त्रास देणारी, अशी समजूत आहे. पण, डॉ. वसुधा बोंडे यांनी मला भरपूर प्रेम दिले, मी आज पक्षाची उमेदवार नाही, माझ्या उमेदवारीमुळे अनेक अडचणी माझ्या भावाला येतात, पण डॉ. वसुधा बोंडे या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. तू लढ, घाबरू नको असे त्या म्हणतात. यावेळी संगीता शिंदे या आई आणि वडिलांची आठवण काढताना भावूक झाल्या.
पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागावाटपात शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली आहे. मात्र, भाजपचे पदाधिकारी चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार यांनी बंडखोरी केली. याची गंभीर दखल घेत भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड यांनी तिघांनाही तातडीने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी