
११ हजार ४३९ महिला आणि २ हजार ७४७ पुरुषांचा समावेश
उत्तीर्ण नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र
अमरावती, २२ ऑक्टोबर (हिं.स.) : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत’ अमरावती जिल्ह्यात रविवार, २५ ऑक्टोबर रोजी ‘पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी’ आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीसाठी जिल्ह्यातील १४ हजार १८६ असाक्षरांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये ११ हजार ४३९ महिला आणि २ हजार ७४७ पुरुषांचा समावेश आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) तथा नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सदस्य सचिव सतीश मुगल यांनी दिली.
देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींना वाचन, लेखन आणि संख्याज्ञानाचे मूलभूत कौशल्य प्राप्त करून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नवसाक्षरांचे मूल्यांकन करून त्यांना साक्षरतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात चाचणीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते ५ पर्यंत परीक्षा केंद्रे सुरू
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षा केंद्रे सुरू राहतील. प्रत्यक्ष चाचणीचा कालावधी तीन तासांचा असेल. दिव्यांग परीक्षार्थींना ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. यू-डायस क्रमांकानुसार नोंदणी झालेली प्रत्येक शाळा हेच संबंधित परीक्षार्थींसाठी परीक्षा केंद्र असेल.
ही मूल्यांकन चाचणी एकूण १५० गुणांची असून, तिचे तीन भाग करण्यात आले आहेत. भाग ‘क’मध्ये वाचनासाठी ५० गुण, भाग ‘ख’मध्ये लेखनासाठी ५० गुण आणि भाग ‘ग’मध्ये संख्याज्ञानासाठी ५० गुण निर्धारित करण्यात आले आहेत.
उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे किमान ३३ टक्के म्हणजे १७ गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच, एकूण १५० गुणांपैकी किमान ३३ टक्के म्हणजे ५१ गुण मिळवणे अनिवार्य आहे. कोणत्याही एका विभागात आवश्यक गुण कमी पडल्यास नियमानुसार जास्तीत जास्त पाच ग्रेस गुण देण्याची तरतूद आहे.
नऊ भाषांमध्ये ऑफलाइन चाचणी
परीक्षा
मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि बंगाली आदी भाषांमध्ये पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ‘उल्लास ॲप’वर ऑनलाइन नोंदणी न केलेल्या असाक्षर व्यक्तींनाही चाचणीच्या दिवशी नोंदणी करून परीक्षेत सहभागी होता येणार आहे. परीक्षेला येताना परीक्षार्थींनी नोंदणी अर्जावर स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो लावणे आवश्यक आहे. तसेच, ओळख पटविण्यासाठी मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक पासबुक यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मूल्यांकन चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत परीक्षार्थींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी