धामणगाव रेल्वेत बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न गंभीर
बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी अमरावती, २२ ऑक्टोबर (हिं.स.) : शहराचा झपाट्याने विस्तार आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे धामणगाव रेल्वे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दि
रस्त्यांवर वाहनचालकांची मनमानी; धामणगावात वाहतुकीला वाली कोण?


बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण

बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी

अमरावती, २२ ऑक्टोबर (हिं.स.) : शहराचा झपाट्याने विस्तार आणि वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ यामुळे धामणगाव रेल्वे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करून सुसाट धावणारी वाहने, कर्णकर्कश हॉर्न, बुलेटच्या सायलेन्सरमधून निघणारे फटाक्यांसारखे आवाज आणि बाजारपेठेतील पार्किंगचा अभाव यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिस आणि संबंधित प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीवर ताण

यवतमाळ जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि विद्यानगरी म्हणून ओळख असलेल्या धामणगाव रेल्वे शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला आहे. शहरातील लोकवस्ती आणि वाहनांची संख्या वाढत असताना वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मात्र, काही वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहने चालविली जात असल्याचे चित्र दिसून येते. अशा प्रकारांमुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता असून, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास

बुलेट मोटारसायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाके फुटल्यासारखा मोठा आवाज काढण्याचे प्रकारही नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर वाहनचालक दचकतात. यामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडण्यासोबतच रस्त्यावरील सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. वाहनांच्या मूळ सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्यांची तपासणी करून नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

बाजारपेठेत पार्किंगअभावी वाहतूक कोंडी

शहराच्या बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनतळाच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियोजित पार्किंगची सुविधा नसल्याने अनेक वाहनधारक रस्त्याच्या कडेला किंवा मिळेल त्या जागेत वाहने उभी करतात. परिणामी, रस्त्याचा बराच भाग व्यापला जात असून, वाहतुकीच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात.

यातच काही व्यावसायिकांकडून दुकानांतील साहित्य रस्त्यापर्यंत मांडले जात असल्याने उपलब्ध रस्ता आणखी अरुंद होतो. त्यामुळे बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बाजारपेठेत नियोजित वाहनतळ उपलब्ध करून देण्याची तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर नियमांनुसार कारवाई करण्याची गरज आहे.

वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीची अपेक्षा

वाढती

वाहनसंख्या, बेशिस्त पार्किंग, ध्वनिप्रदूषण आणि वेगमर्यादेचे उल्लंघन या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलिस व संबंधित प्रशासनाने नियमित तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करण्यासोबतच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणेही आवश्यक आहे.

शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचा धोका कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, यासाठी प्रशासनाने समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा धामणगाव रेल्वेतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande