
नांदेड, २२ ऑक्टोबर (हिं.स.) : डोंगरकडा येथे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या एसटी बसेसविरुद्ध नांदेड विभागाच्या मार्ग तपासणी पथकाने कारवाई केली. सहाय्यक वाहतूक निरीक्षक आय. एन. राठोड आणि चालक एस. जी. जाधव यांनी ही कारवाई केली असून, संबंधित एसटी बस चालक व वाहकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
डोंगरकडा येथील उड्डाणपुलावरून एसटी बसेस जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड विभागाच्या मार्ग तपासणी पथकाने संबंधित बसेसची तपासणी केली. या वेळी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित चालक व वाहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान प्रवासी एसटी बस सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गावंडे, प्रसिद्धीप्रमुख नागेश पांचाळ, दीपक लिंगायत आणि बालाजी गावंडे उपस्थित होते.
नांदेड विभागाच्या मार्ग तपासणी पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल डोंगरकडा येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि एसटी बससेवा नियमानुसार चालावी, या दृष्टीने अशा तपासणी मोहिमांना महत्त्व असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis