
नांदेड, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड शहरातील इतवारा आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ३२ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देगलूर नाका परिसरातील लक्ष्मीनगर येथे घडली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २९ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुरनं. ३५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(४) आणि ३०५(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जावेद पठाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेदांतनगर परिसरातील सिद्धेश्वर पार्क येथे घडली. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ९१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis