
मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। : कला, कलाकार आणि कलाशिक्षणाला प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरे कॉलनी येथे उभारण्यात येत असलेल्या ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या केंद्रामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
आरे कॉलनी येथील निसर्गरम्य परिसरात आयोजित ‘शिल्परंग-१२’ या राष्ट्रीय कला परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार रवींद्र वायकर, एबीपी न्यूज व एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, वित्त विभागाचे सहसचिव संजय इंगळे, आरे मिल्क कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर, ‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र बोरलेपवार, मयुरी बोरलेपवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्राला अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून वारली चित्रकलेपर्यंत आणि आधुनिक चित्रकला व शिल्पकलेपर्यंत समृद्ध कलापरंपरा लाभली आहे. कला ही केवळ सौंदर्याची अनुभूती देणारी नसून ती माणसाला विचार करायला शिकवते, संवेदनशील बनवते आणि समाजाला एकत्र जोडते. रस्ते, उद्योग, शिक्षण व पायाभूत सुविधांप्रमाणेच कला, संस्कृती आणि सर्जनशीलताही समाजाच्या समृद्धीचे महत्वाचे मापदंड आहेत.
‘ओम’ या केंद्राच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांना प्रदर्शनासोबतच एकत्र राहून कलानिर्मिती करणे, नवनवीन प्रयोग करणे आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होत आहे. ‘शिल्परंग’सारख्या उपक्रमांमुळे विविध राज्यांतील कलाकार एकत्र येऊन भारतीय सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवतात. युवा कलाकारांनी आपल्या कलेवर विश्वास ठेवत नवनवीन प्रयोग करावेत आणि आपल्या मातीशी नाते जपत जागतिक विचारांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कला क्षेत्रातील महिलांचा सहभागही महत्वाचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, अधिकाधिक मुलींना कलाशिक्षण, कलानिर्मिती आणि व्यावसायिक संधी मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. कला क्षेत्राला राजाश्रय मिळणे गरजेचे असल्याने कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासोबत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. दृश्य कला (व्हिज्युअल आर्ट्स) हा विषय सांस्कृतिक कार्य विभागाकडे वर्ग करण्याबाबतही सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दृश्य कलांना व्यापक व्यासपीठ देण्याची गरज – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलानिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राजाश्रय वाढविण्यासह त्यांच्या संकल्पनांना भक्कम पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. भारतीय चित्रकला आणि शिल्पकलेला समृद्ध परंपरा लाभली असून, तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासन, कला क्षेत्र आणि समाजाने एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. दृश्य कला आणि सादरीकरण कला या दोन्ही क्षेत्रांचा समतोल विचार करून दृश्य कलांना अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
‘ओम द ग्लोबल आर्ट सेंटर’ आणि ‘आरे म्युझियम’ येथे साकारलेल्या शिल्पांमध्ये केवळ मूर्त स्वरूप नसून त्यामागे भावनिक, संवेदनशील आणि नैसर्गिक आशय दडलेला आहे. कलाकृतीचे सौंदर्य अनुभवण्याबरोबरच त्यामागील विचार, भावना आणि तत्त्वज्ञान समजून घेणेही महत्वाचे आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्यासह अनेक कलाकारांनी रंगांच्या माध्यमातून व्यापक विचार मांडण्याची परंपरा जपली आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय जीवनपद्धती, अध्यात्म आणि संस्कृतीमध्ये रंगांना विशेष महत्व आहे. रंगसंगतीचा संबंध मानवी भावना, संवेदना आणि तत्त्वज्ञानाशी आहे. चित्रकारांनी आपल्या कलाकृतींतून भारतीय परंपरा, विचार आणि जीवनदृष्टी प्रभावीपणे मांडावी. शिल्पकलेने लेणी, वास्तू आणि विविध कलाकृतींच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीला आकार दिला असून, या परंपरेशी नव्या पिढीचे नाते जोडण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत, असेही मंत्री शेलार यांनी नमूद केले.
२१ चित्रकार व शिल्पकारांचा सन्मान
‘शिल्परंग-१२’ या राष्ट्रीय कला परिसंवादात देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या २१ चित्रकार व शिल्पकारांचा शाल आणि प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये विनोद शर्मा, सुहास बहुलकर, चरण शर्मा, जॉन डगलस, निलेश वेडे, प्रदीप जोगदंड, रमेश चंद्र, साक्षी कदम, आनंद पांचाळ, सिद्धार्थ शिंगाडे, नितीन मिस्त्री, अमरनाथ शर्मा, प्रदीप कामिया, नीना देवांगन, वैभव मोरे, जगन्नाथ महापात्रा, दिलीप शर्मा, योगेश मुरकुटे, मान काफर, रविकुमार आणि केतन खुटले यांचा समावेश होता. यावेळी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी साकारलेल्या शिल्पांची पाहणी करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कलाकारांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले.
यावेळी खासदार रवींद्र वायकर, एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांची भाषणे झाली. ओमचे संस्थापक डॉ.नरेंद्र बोरलेपवार यांनी प्रास्ताविक तर सहसचिव संजय इंगळे यांनी आभारप्रदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर