
बीड, 24 ऑक्टोबर (हिं.स.) परळी वैजनाथ तालुक्यातील सिरसाळा येथील गट क्रमांक 362, 363 व 364 परिसरातील खाणकाम, ब्लास्टिंग, खडी क्रशर, इको सँड व डस्ट प्लांटच्या कामकाजामुळे शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रहीम खान सिकंदर खान पठाण व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
तक्रार अर्जानुसार, ब्लास्टिंगमुळे
होणारे स्फोट, जमिनीतील कंपन आणि हवेत पसरणाऱ्या धुळीमुळे शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित कामकाजामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, बीड, पोलीस
अधीक्षक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा खनिकर्म विभाग, तहसीलदार आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर गटविकास करण्यात आला आहे. तक्रारीसोबत छायाचित्रे व इतर कागदपत्रेही जोडण्यात आली आहेत. संबंधित उद्योगांकडे आवश्यक परवानग्या
आहेत का, पर्यावरणविषयक नियमांचे पालन केले जाते का आणि ब्लास्टिंग निर्धारित नियमांनुसार होते का, याची तपासणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा आणि नुकसान झाल्याचे सिद्ध झाल्यास नियमानुसार नुकसानभरपाईसाठी कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या तक्रारीची प्रशासनाकडून दखल घेऊन चौकशी केली जाते का आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होते का, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis