रायगड - ७२१ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर; ११ हजार १४५ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध
रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। Writing : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ७२१ शेतकऱ्यांची चौथी यादी २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार १४५ लाभार्थी शेतकऱ्यांच्य
shetkari


रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।

Writing

: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील ७२१ शेतकऱ्यांची चौथी यादी २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ हजार १४५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर झाल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या २ जून २०२६ रोजीच्या निर्णयानुसार ही योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि निर्धारित मुदतीत परतफेड न झालेल्या पात्र पीक कर्जांचा यात समावेश आहे.

जिल्ह्यातील बँकांनी पोर्टलवर १२ हजार ७४ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली असून, संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जात आहेत

चौथ्या यादीतील शेतकऱ्यांची नावे संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायती येथे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी यादीत नाव तपासून ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी पडताळावी. त्यानंतर जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे.

प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यावर जमा होणार आहे. पात्र मयत, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांसाठीही विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande