‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार २०२६’साठी नामनिर्देशन सुरू
रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडदुर्गांचा अभ्यास, इतिहास संशोधन, जतन आणि संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी ऑ
Nominations-open-for-Amrut-Sh


रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडदुर्गांचा अभ्यास, इतिहास संशोधन, जतन आणि संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘अमृत शिवदुर्ग भूषण पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रिया १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील गडदुर्गांचा ऐतिहासिक वारसा जतन करणे, त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन व संवर्धन करणे आणि दुर्गसंस्कृतीचा प्रसार करणाऱ्या समर्पित व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांसह राज्यातील गडदुर्गांसाठी योगदान देणाऱ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे व्यक्तिगत आणि संस्थात्मक असे दोन विभाग आहेत. दोन्ही विभागांतील विजेत्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, विशेष सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासक आणि अनुभवी संशोधकांचा समावेश असलेली पुरस्कार समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राप्त नामनिर्देशनांचे परीक्षण करून समिती अंतिम विजेत्यांची निवड करणार आहे.

यापूर्वी व्यक्तिगत विभागातून दुर्ग अभ्यासक प्रा. के. घाणेकर, तर संस्थात्मक विभागातून दुर्गसंवर्धनासाठी कार्यरत सह्याद्री प्रतिष्ठानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.प्राप्त अर्जांची छाननी २ ते ३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणार आहे. इच्छुकांनी www.amrutdurgotsav.com या संकेतस्थळावर नामनिर्देशन नोंदवावे. दुर्गसंस्कृतीचा वारसा जतन करणाऱ्या पात्र व्यक्ती व संस्थांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी अमृत, रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग येथे किंवा ९११२२२८७५९, ९४२३८९२१८२ आणि ८१४९५५२१४३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande