दिवाळीपूर्वी ग्रॅच्युटी न मिळाल्यास बेस्टचे निवृत्त कामगार करणार काळी दिवाळी
डोंबिवली, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।बेस्टमधून निवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युटी आणि इतर प्रलंबित देणी दिवाळीपूर्वी देण्यात यावीत अशी मागणी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने केली आहे. दिवाळीपूर्वी ही देणी न मिळाल्यास ४,४०० निवृत्त कामगार आझाद म
Ph01


डोंबिवली, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।बेस्टमधून निवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युटी आणि इतर प्रलंबित देणी दिवाळीपूर्वी देण्यात यावीत अशी मागणी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने केली आहे. दिवाळीपूर्वी ही देणी न मिळाल्यास ४,४०० निवृत्त कामगार आझाद मैदानावर एकत्र येऊन काळी दिवाळी आंदोलन करतील असा इशारा समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी दिला आहे.

बेस्टमधून निवृत्त झालेल्या अनेक कामगारांची ग्रॅच्युटी आणि इतर देणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेक कामगारांना हक्काचे पैसे मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर काही ज्येष्ठ कामगार गंभीर आजारांनी त्रस्त असून आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे निवृत्त कामगारांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने अनेक आंदोलने केली आहेत. आमरण उपोषण, साखळी उपोषण, चड्डी-बनियान आंदोलन तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चाही काढण्यात आला. मात्र अद्याप कामगारांच्या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचे पानवडीकर यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात बेस्टच्या अध्यक्षा मुंबईच्या महापौर, महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्यासोबत समितीच्या वतीने बैठका घेण्यात आल्या. या वेळी दिवाळीपूर्वी सर्व निवृत्त कामगारांची ग्रॅच्युटी आणि इतर प्रलंबित देणी देण्याचे आश्वासन मिळाल्याचा दावा समितीने केला आहे. बेस्टच्या सेवेत ३५ ते ४० वर्षे काम करूनही निवृत्तीनंतर स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागत आहे ही दुर्दैवी बाब असल्याचे पानवडीकर सांगतात. आता केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पैसे देण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीपूर्वी सर्व देणी एकरकमी अदा न केल्यास आझाद मैदानावर आंदोलन करून दिवाळीची पहिली पहाट काळी पहाट म्हणून साजरी करण्यात येईल. तसेच बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका प्रशासन, महापौर आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात काळी दिवाळी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समितीने दिला आहे. निवृत्त कामगारांची ग्रॅच्युटी आणि इतर देणी तातडीने देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीने केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande