पुणे - अवैध उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाचा रस्ता मुरूम टाकून अडवला
पुणे, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। खेड तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार प्रशांत बेडसे आणि महसूल विभागाच्या पथकाचा रस्ता हायवा चालकाने मुरूम टाकून अडवल्याची घटना घडली. तसेच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पथकाच्या गाड्या रोखल्
पुणे - अवैध उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाचा रस्ता मुरूम टाकून अडवला


पुणे, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। खेड तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार प्रशांत बेडसे आणि महसूल विभागाच्या पथकाचा रस्ता हायवा चालकाने मुरूम टाकून अडवल्याची घटना घडली. तसेच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पथकाच्या गाड्या रोखल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबींचे चालक घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यासह महसूल विभागाचे पथक राजगुरुनगर येथून पाबळ रस्त्याने अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी निघाले होते. या पथकात निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, ग्राम महसूल अधिकारी मनीषा जानराव, विजया पाटील, ब्रह्मानंद टाचणे तसेच महसूल सेवक दत्तात्रय चव्हाण, संतोष बोऱ्हाडे आणि सुनील गायकवाड यांचा समावेश होता.

निमगाव हद्दीतील खेड सिटी परिसरात एमएच-१२ वाय-क्यू ७९४६ क्रमांकाचा हायवा कनेरसरकडून खेडच्या दिशेने मुरूम वाहून नेत असल्याचे महसूल पथकाच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पथकाने आपल्या गाड्या वळवून हायवाचा पाठलाग सुरू केला. यावेळी हायवा चालकाने मुरूम टाकून पथकाचा मार्ग अडवल्याची घटना घडली.

दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या दोघांनीही पथकाच्या गाड्या रोखल्या. या गोंधळादरम्यान उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन जेसीबींचे चालक घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande