
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या आणि प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी नांदेड तहसील कार्यालयात शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता कर्मचारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्या 2 मे 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबिर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयातील त्यांच्या कक्षात हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात वेतन, बढती, बदली, निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती उपदान, रजा, सेवापुस्तिकेचे अद्ययावतीकरण, अनुकंपा नियुक्ती तसेच अन्य सेवाविषयक प्रकरणांशी संबंधित समस्या व तक्रारींचा आढावा घेण्यात येणार आहे. संबंधित प्रकरणांचे निराकरण करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यावर या शिबिरात भर दिला जाणार आहे.
नांदेड तालुक्यातील शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी या शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार, नांदेड यांनी केले आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis