
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। आर्थिक अडचणींमुळे समाजातील अनेक गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबांना दिवाळीचा सण साजरा करताना विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्याही घरात आनंदाचा दिवा उजळावा आणि प्रत्येक कुटुंबाला सणाचा उत्साह अनुभवता यावा, या सामाजिक भावनेतून आमदार रवि राणा व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून यंदाही भव्य दिवाळी किराणा वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ नुकताच हनुमान नगर परिसरातून भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा उत्सव मानला जातो. मात्र, वाढती महागाई आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांना सणासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू खरेदी करणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन राणा दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यंदाच्या उपक्रमांतर्गत संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील तब्बल ३ लाख कुटुंबांपर्यंत दिवाळीच्या किराण्याची भेट पोहोचविण्याचा भव्य संकल्प राणा दांपत्याने केला आहे.
हनुमान नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील हजारो गरजू व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शेकडो महिला व नागरिकांना दिवाळी किराणा संचाचे वाटप करण्यात आले. हा किराणा हाती पडताच उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले.
या प्रसंगी बोलताना भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सांगितले की, गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणे ही आमची प्राथमिकता आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचावा आणि आर्थिक टंचाईमुळे कोणत्याही कुटुंबाचा दिवाळीचा आनंद हिरावला जाऊ नये, याच उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आमची खरी दिवाळी आहे.या किराणा वाटप उपक्रमात दैनंदिन आणि दिवाळी सणासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे सणाच्या काळात गोरगरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार रवि राणा आणि नवनीत राणा यांनी घेतलेल्या या निर्णयाचे अमरावती शहर व ग्रामीण भागात सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.हनुमान नगरमधील या यशस्वी शुभारंभानंतर आता जिल्ह्यातील विविध भागात टप्प्याटप्प्याने या किराणा वाटप मोहिमेचा विस्तार केला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन हा किराणा पोहोचवला जाईल, जेणेकरून जिल्ह्यातील एकही गरजू कुटुंब सणाच्या आनंदापासून वंचित राहणार नाही. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांची दिवाळी यंदा खऱ्या अर्थाने गोड आणि प्रकाशमय होणार आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी