
आगामी ८ नोव्हेंबरला सामाजिक उपक्रमांचे आयोजन
अमरावती, २८ ऑक्टोबर (हिं.स.)। शकुंतला रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाच्या आठव्या वर्षातील ४२ व्या टप्प्याच्या नियोजन बैठकीत यंदाची दिवाळी शकुंतला रेल्वेस्थानकावर विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, अचलपूर आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक स्थानिक ऑक्सिजन पार्क येथे सकाळी ११ वाजता पार पडली. रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन रेल्वेसेवा सुरू होईपर्यंत अहिंसात्मक जनआंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
रेल्वेस्थानकाच्या सुविधांबाबत नाराजी
बैठकीत शकुंतला रेल्वेस्थानक परिसराच्या स्वच्छतेचा आणि रंगरंगोटीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाची जबाबदारी असतानाही २०१९ पासून स्थानकाकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी उपस्थितांनी व्यक्त केली. समितीच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे स्थानकावरील आरक्षण खिडकी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
स्थानकातून दरमहा सुमारे २७ लाख रुपयांची कमाई होत असल्याचा दावा करण्यात येत असतानाही प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच स्थानक परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढत असल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली.
स्वच्छता अभियान आणि फराळ वाटप
दिवाळीनिमित्त ८ नोव्हेंबर रोजी शकुंतला रेल्वेस्थानक परिसरात सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सायंकाळी गरजू नागरिकांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात येणार असून, लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करण्याचेही नियोजन आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून रेल्वेस्थानकावर दीपोत्सव साजरा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
पर्यावरण संवर्धनाचाही संदेश
सध्या जाणवणाऱ्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे यांनी सत्याग्रह समितीच्या सदस्यांना बेलपत्र, शमीपत्र आणि प्राणवायूचा स्रोत ठरणारी रोपटी वितरित केली. सामाजिक आंदोलनासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही पार पाडण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाची पुढील दिशा निश्चित
बैठकीत योगेश खानझोडे, राजा धर्माधिकारी, संतोष नरेडी, दीपा तायडे आणि शारदा उईके यांनी आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबत विचार मांडले. यावेळी विजय गोंडचवर, वसंतराव धोंबे, कमल केजरीवाल, डॉ. दीपक गुल्हाने, राजेश पांडे, राजेश अग्रवाल, विजय सातपुते, राजकुमार बरडिया, राजेंद्र जयस्वाल, प्यारेलाल प्रजापती, सुरेश प्रजापती आणि दयाराम चंदेल यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.शकुंतला रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रूपांतर करून नियमित रेल्वेसेवा सुरू करावी, ही प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन अहिंसात्मक मार्गाने सुरू ठेवण्यात येईल, असा निर्धार समितीने व्यक्त केला.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी