
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। मसाल्यांच्या पाकिटांवरील माहितीतील त्रुटी आणि गुलाबजामून मिक्सच्या उत्पादन तारखेबाबत आढळलेल्या अनियमिततेमुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तिवसा एमआयडीसी परिसरातील के. एल. फूड्स इंडस्ट्रीज या कारखान्यावर रविवारी छापा टाकला. या कारवाईत एकूण १ लाख ३७ हजार ४० रुपयांचा मसाला आणि इन्स्टंट गुलाबजामून मिक्सचा साठा जप्त करण्यात आला.
सहआयुक्त (अन्न) विनय चव्हाण आणि अन्नसुरक्षा अधिकारी डॉ. विजय गोंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान मसाल्यांच्या पाकिटांवर आवश्यक माहिती स्पष्टपणे नमूद नसल्याचे आढळले. त्यामुळे सुमारे ४८ हजार रुपयांची मसाला पाकिटे जप्त करण्यात आली.तसेच, इन्स्टंट गुलाबजामूनमिक्सच्या पाकिटांवर याच महिन्यात पुढील महिन्याची उत्पादन तारीख टाकल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी ८९ हजार रुपयांचा गुलाबजामून मिक्सचा साठा जप्त करण्यात आला. अन्नसुरक्षा नियमांनुसार सीलबंद पाकिटांवर घटक, उत्पादकाचे नाव व पत्ता, परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि अंतिम वापराची मुदत नमूद करणे आवश्यक आहे. या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या पॅकिंग आणि लेबलिंगमधील त्रुटींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी