
डाक जीवन विमा प्रतिनिधी होण्याची सुवर्णसंधी
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय डाक विभागाच्या डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (आरपीएलआय) योजनांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नांदेड डाक विभागाकडून थेट विमा प्रतिनिधी (डायरेक्ट एजंट) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार, दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड येथे घेण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. केंद्र किंवा राज्य शासनाने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बेरोजगार व स्वयंरोजगार करणारे युवक-युवती, माजी विमा सल्लागार, विमा कंपन्यांचे माजी विमा प्रतिनिधी, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, महिला मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामप्रधान, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला बचत गटांचे सदस्य यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विम्याविषयीचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक भागाची माहिती या बाबींची तपासणी केली जाईल. निवड झालेल्या उमेदवाराला 5 हजार रुपये सुरक्षा ठेव राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) किंवा किसान विकास पत्र (केव्हीपी) स्वरूपात जमा करावी लागेल.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाची (आयआरडीएआय) परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हा परवाना कायमस्वरूपी करण्यात येईल. ही परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ही नियुक्ती परवाना व कमिशन तत्त्वावर राहणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज अधीक्षक डाकघर कार्यालय, नांदेड विभाग, नांदेड येथे उपलब्ध करून घ्यावा. भरलेला अर्ज घेऊन दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. यावेळी बायोडाटा, मूळ कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सोबत आणावीत, असे आवाहन अधीक्षक डाकघर, नांदेड विभाग यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis