नांदेडमध्ये सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे न्याय्य आणि तत्परतेने निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियो
नांदेडमध्ये सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन


नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे न्याय्य आणि तत्परतेने निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत हा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपल्या तक्रारी व अडचणी प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. या दिवशी अर्जांची नोंदणी दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू होईल. त्यानंतर प्राप्त अर्ज व निवेदनांवर संबंधित नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे.लोकशाही दिनासाठी महसूल, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी आणि पाणीपुरवठा विभागांसह विविध विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तसेच लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांशी संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या तक्रारी व अडचणी समजून घेऊन त्यांचे शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.नागरिकांनी सोमवार, 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande