नांदेडमध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ
नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। बालकांना जंतांच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. पेरके यांच्या ह
G


नांदेड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। बालकांना जंतांच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून त्यांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी जिल्हा रुग्णालय, नांदेड येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. पेरके यांच्या हस्ते करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनुपमा बालाजी शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. बुट्टे, डॉ. लोमटे, प्रभारी परिचारिका रेखा मुंडे, परिचारिका जयश्री वाघ, आरकेएसके समुपदेशक धनश्री गुंडाळे तसेच परिचर्या विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करताना जंतांच्या प्रादुर्भावामुळे रक्तक्षय होण्याची शक्यता असते, तसेच वारंवार पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली. बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दर सहा महिन्यांनी जंतनाशक गोळी देणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना नियमितपणे जंतनाशक गोळ्या देण्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत 1 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना अल्बेंडाझोल गोळीची अर्धी मात्रा योग्य पद्धतीने देण्यात येणार आहे, तर 2 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना एक गोळी देण्यात येणार आहे. मोहिमेच्या दिवशी, 27 ऑक्टोबर रोजी जंतनाशक गोळी घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी 3 नोव्हेंबर 2026 रोजी पूरक मोहीम अर्थात मॉप-अप दिन राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जंतनाशक गोळी देऊन या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. पेरके यांनी केले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande