वाहतुकीचा वाढता ताण पाहता कुसुमकोट खुर्द रस्ता रुंदीकरणाची नागरिकांची मागणी
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) | धारणी शहराला लागून असलेल्या कुसुमकोट खुर्द गावापर्यंतच्या धारणी-अकोट मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, ढाकणा फाटा ते कुसुमकोट खुर्दपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या हा र
कुसुमकोट खुर्द रस्त्याचे रुंदीकरण करा


अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) | धारणी शहराला लागून असलेल्या कुसुमकोट खुर्द गावापर्यंतच्या धारणी-अकोट मार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, ढाकणा फाटा ते कुसुमकोट खुर्दपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या हा रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. धारणी शहरापासून कुसुमकोट खुर्दपर्यंतच्या या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर शाळा-महाविद्यालय असल्याने सकाळी, दुपारी आणि सायंकाळी वाहतुकीचा ताण वाढतो. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, शालेय बससह दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. रस्ता अरुंद असल्याने अनेकदा वाहनांची कोंडी होते. परिणामी, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. धारणी शहराचा विस्तार आणि या मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता, भविष्यातील गरजांसाठी रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक बनले आहे. रस्ता रुंद झाल्यास वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासह नागरिकांनाही दिलासा मिळू शकेल. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने संबंधित विभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करावी. तसेच ढाकणा फाटा ते कुसुमकोट खुर्दपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करून संबंधित विभागाने वेळीच कार्यवाही केल्यास भविष्यातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल.

अकोट फाटा परिसरातही ताण

अकोट फाटा परिसरात धान्य खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची अनेक दुकाने आहेत. त्यामुळे या भागात मालवाहू वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मालवाहू वाहने, दुचाकी, चारचाकी आणि शालेय बसेस एकाच वेळी रस्त्यावर आल्याने वाहतूक सुरळीत ठेवताना अडचणी निर्माण होतात. विशेषतः शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होते. अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande