उत्तराखंड : हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह 6 जणांचा मृत्यू
जोशीमठच्या पांडुकेश्वर परिसरातील डोंगरावर झाली भीषण दुर्घटना डेहराडून, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : उत्तराखंडच्या बद्रीनाथहून डेहराडूनकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात घडला असून यात वैमानिकासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिक
हेलिकॉप्टर अपघातानंतर पहाडावर मदतकार्यासाठी पोहचलेल्यांचे छायाचित्र


जोशीमठच्या पांडुकेश्वर परिसरातील डोंगरावर झाली भीषण दुर्घटना

डेहराडून, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : उत्तराखंडच्या बद्रीनाथहून डेहराडूनकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात घडला असून यात वैमानिकासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी नंदकिशोर जोशी यांनी दिली. उड्डाणानंतर या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. तेव्हापासून शोध मोहिम राबवली जात होती. अखेर अपघाताची भीती खरी ठरून त्यात वैमानिक आणि 5 प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचे स्पष्ट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्स भारत एव्हिएशन कंपनीच्या या हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट आणि पाच प्रवासी असे एकूण 6 जण प्रवास करत होते. सर्व प्रवासी कर्नाटकातील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये हेलिकॉप्टरचा वैमानिक कॅप्टन हिमांशू सभरवाल , प्रताप (वय ४१) अरुण साळुंके (वय ४४), व्ही. बी. शंकर गौडा (वय ३९),

सुधीर के. (वय ५०) आणि एस. एस. नटराजा यांचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी कर्नाटकचे रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनच्या सहस्रधारा हेलिपॅडकडे जात होते. मात्र, जोशीमठ आणि बद्रीनाथदरम्यान पांडुकेश्वर परिसरात ते डोंगरावर कोसळले.अपघाताची माहिती मिळताच लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. लष्कराने बचावकार्याची धुरा सांभाळली. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मेसर्स ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व हेलिकॉप्टर उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून घटनेची दखल

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. जोशीमठजवळील चाई गाव परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने बचावकार्य सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री धामी यांनी संपूर्ण परिस्थितीवर आपण सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. जखमींना तातडीने एअरलिफ्ट करून उच्चस्तरीय वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचविण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

खराब हवामानातही हेलिकॉप्टर उड्डाणे सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी खराब हवामान असतानाही बद्रीनाथसाठी हेलिकॉप्टर उड्डाणे सुरू होती. दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी एका हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि ते सुरक्षितपणे डेहराडूनला पोहोचले. त्यानंतर दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी देहरादूनच्या दिशेने दुसऱ्या हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र, हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली.

दुपारी १ वाजून २० मिनिटांनी आणखी एका हेलिकॉप्टरने बद्रीनाथहून उड्डाण केले आणि तेही सुरक्षितपणे डेहरादूनला पोहोचले. त्यानंतर १ वाजून १२ मिनिटांनी उड्डाण केलेले हेलिकॉप्टर बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, यानंतरही दुपारी २ वाजून १० मिनिटांनी, २ वाजून १५ मिनिटांनी आणि २ वाजून २२ मिनिटांनी हेलिकॉप्टर उड्डाणे झाल्याची माहिती आहे.

दिवसभरात देहराडूनच्या दिशेने सुमारे १२ हेलिकॉप्टर उड्डाणे झाली होती. ही सर्व उड्डाणे चार्टर स्वरूपातील होती. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, खराब हवामान आणि अपघाताशी संबंधित परिस्थितीची तपासणी होण्याची शक्यता आहे.

-----------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande