अमरावती - चारा, पाण्याअभावी पशुपालक हतबल; गुरांची विक्री वाढली
अमरावती, 31 ऑक्टोबर, (हिं.स.) पावसाअभावी शेतीचे गणित बिघडले असून, चारा व पाणीटंचाईमुळे पशुपालकांसमोरील संकट गंभीर झाले आहे. गुरांच्या संगोपनाचा वाढता खर्च आणि शेतीतून घटलेले उत्पन्न, यामुळे अनेक शेतकऱ्यांना पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या गायी, वासरे
अमरावती - चारा, पाण्याअभावी पशुपालक हतबल; गुरांची विक्री वाढली


अमरावती, 31 ऑक्टोबर, (हिं.स.) पावसाअभावी शेतीचे गणित बिघडले असून, चारा व पाणीटंचाईमुळे पशुपालकांसमोरील संकट गंभीर झाले आहे. गुरांच्या संगोपनाचा वाढता खर्च आणि शेतीतून घटलेले उत्पन्न, यामुळे अनेक शेतकऱ्यांना पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या गायी, वासरे व अन्य पशुधनाची विक्री करण्याची वेळ आली आहे. पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यासह तालुक्यात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांना सुका चारा आणि पशुखाद्य विकत घ्यावे लागत आहे. पाण्याची व्यवस्था करणेही कठीण झाले आहे. परिणामी, जनावरांचे संगोपन परवडत नसल्याने अनेक पशुपालक गुरे विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत. परिसरातील गायी, बैल आणि वासरांच्या संख्येत सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा पशुपालकांकडून करण्यात येत आहे. लहान वासरांच्या संगोपनाचा खर्च वाढल्याने त्यांचा सांभाळ करायचा की विक्री, असा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे. जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे. वर्षानुवर्षे कुटुंबाचा भाग बनलेल्या जनावरांना आर्थिक अडचणींमुळे विकणे शेतकऱ्यांसाठी भावनिकदृष्ट्याही वेदनादायी ठरत आहे. पशुधन विकल्यानंतर दुग्धव्यवसाय पुन्हा उभा करणे आणि शेतीकामासाठी जनावरांची व्यवस्था करणे कठीण होण्याची शक्यता आहे.

गुरांच्या मागणीत घट

चारा-पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकरी गुरे विक्रीसाठी आणत असले, तरी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरेदीदारांची संख्या घटल्याचे चित्र आहे. त्यामुळे गुरांना अपेक्षित भाव मिळत नसून, काही शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी किमतीत पशुधन विकावे लागत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

चारा छावण्या सुरू करा

पशुधन वाचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. गरजेनुसार चारा छावण्या सुरू करणे, चारा डेपो उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि परवडणाऱ्या दरात चारा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या उपाययोजना वेळेत केल्यास पशुधनाची होणारी हानी टाळण्यासह पशुपालकांना आर्थिक संकटातून दिलासा मिळू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande