संत्राबाग वाचविण्यासाठी लहान फळांचा बळी पाणीटंचाईची झळ; कवडीमोल भावाने शेतकरी रडकुंडीला
अमरावती, 31 ऑक्टोबर, (हिं.स.)। संत्राबागेत फळे लागलेली असताना केवळ पाण्याच्या टंचाईमुळे संत्राबाग उद्ध्वस्त होऊ नये म्हणून लहान आकाराच्या फळांची कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे वर्षभराचे आर्थिक गणित मांडताना शेतकरी
संत्राबाग वाचविण्यासाठी लहान फळांचा बळी पाणीटंचाईची झळ, कवडीमोल भावाने शेतकरी रडकुंडीला


अमरावती, 31 ऑक्टोबर, (हिं.स.)। संत्राबागेत फळे लागलेली असताना केवळ पाण्याच्या टंचाईमुळे संत्राबाग उद्ध्वस्त होऊ नये म्हणून लहान आकाराच्या फळांची कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे वर्षभराचे आर्थिक गणित मांडताना शेतकरी पार रडकुंडीला आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. अशावेळी दरवर्षी शंभर टक्के भरणारी जलाशये यंदाच्या वर्षी आधीच तळ गाठण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. याच मुख्य कारणाने उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे संदेश आतापासूनच दिल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच दरवर्षी पिकांच्या सिंचनासाठी मिळणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मग अशावेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची खासगी व्यवस्था आहे. त्यांनासुद्धा पाण्याटंचाईची झळ बसत आहे. पावसाळा ऋतू संपताच जेमतेम दुसऱ्या ऋतूला सुरवात होत असतानाच पाणीटंचाईची झालेली सुरवात भविष्यात धोकादायक ठरणार आहे. पाणीकपात सुरू होणार असल्यामुळे शेतातील पिकांना मुबलक पाणीपुरवठा होणे अशक्य ठरणार आहे. तेव्हा प्रत्येकालाच पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. याची जाण ठेवत शेतकऱ्यांनी त्यांच्या संत्राबागेतील संत्राफळांना पाणी पुरणार नाही, म्हणून लहान आकारातील संत्राफळांची छटाई करून ती संत्रामंडी मालकांना नाइलाजास्तव वीस रुपये किलोप्रमाणे विकावी लागत आहेत. पाण्याअभावी परतवाडा, वरुड, जरुड, अंबाडा, मोर्शी, शेंदूरजनाघाट, पाळा, खरपी, कारंजालाड, दारव्हा, दिग्रस, मानोरा आणि मंगरूळपीर आदी ठिकाणांवरील संत्राबागांना झळ बसली आहे.

वाळलेली संत्राफळे जातात उदबत्ती फॅक्टरीत

सध्या या संत्राफळांचा आकार लिंबूच्या आकाराएवढा असल्यामुळे याच आकारात ती विकल्या जातात. एकदा आकार मोठा झाला की त्याला तडे जाऊन त्यामध्ये अळ्या निर्माण होत असल्याने खरेदीदार तयार नसतो. ही लहान आकाराची संत्राफळे छोटे व्यापारी २० रुपये किलोने खरेदी करून ती वाळवून घेतात. ज्यामध्ये साधारणतः एक महिन्याचा कालावधी लागतो, नंतर ही वाळलेली संत्राफळे व्यापारी चढ्या भावाने उदबत्ती बनविणाऱ्या फॅक्टरीत विकतात, अशी माहिती संत्रा व्यापारांनी दिली.

-------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande