
परभणी, 31 ऑक्टोबर, (हिं.स.)। आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून परभणी मेडिकल कॉलेज, आरपी हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे दोन दिवसीय मराठवाडा शल्यचिकित्सा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
परभणी सर्जिकल सोसायटीच्या वतीने आयोजित या परिषदेत 200 हून अधिक शल्यचिकित्सक, 250 हून अधिक डॉक्टर आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या 25 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या, हे या परिषदेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
दोन दिवस चाललेल्या या परिषदेत आधुनिक शस्त्रक्रिया पद्धती, प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, नवीन संशोधन तसेच रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाची देवाणघेवाण आणि शल्यचिकित्सकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, हा परिषदेचा उद्देश होता. यानिमित्ताने नामांकित औषधनिर्मिती कंपन्या तसेच शस्त्रक्रियेसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य तयार करणार्या कंपन्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.
परिषदेत डॉ. अनिल देगावकर, डॉ. राम तिडके, डॉ. नितीन जोशी, डॉ. संतोष शिंदे, डॉ. मुख्तादिर अन्सारी, डॉ. मुकेश राठोड, डॉ. पंकज झावर, डॉ. हमीद-उल-करीम, डॉ. कौशल कोंडावार, डॉ. निहार चांडक आणि डॉ. अनघा वारुडकर यांनी वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. तसेच डॉ. विजय बोरगावकर, डॉ. अजय पुनपाळे, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. हरिश्चंद्र वांगे, डॉ. अतुल देशपांडे, डॉ. विजय कदम, डॉ. एकनाथ गबाले आणि डॉ. निखिल चौहान यांनी विविध शैक्षणिक सत्रांत सहभाग घेतला. चर्चासत्रांमध्ये डॉ. नितीन ताठे, डॉ. अश्फिया खान, डॉ. प्रकाश देवडे आणि डॉ. राहुल राठोड यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान दिले.
परिषदेचे आयोजन परभणी सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. परमेश्वर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. श्रीकृष्ण कातनेश्वरकर यांच्यासह डॉ. भगवान कोरडे, डॉ. गणेश चव्हाण आणि डॉ. हमीद करीम यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis