महाडीबीटीत मंजूर ७५ किलोऐवजी ६० किलोच हरभरा बियाणे; महिला शेतकऱ्यांची तक्रार
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। महाडीबीटी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रमाणानुसार प्रत्येक लाभार्थ्याला 75 किलो हरभरा बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सावळी बुद्रुक येथील चार महिला शेतकर्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. महाडीबीटी योजनेंतर्गत
महाडीबीटीत मंजूर ७५ किलोऐवजी ६० किलोच हरभरा बियाणे; महिला शेतकऱ्यांची तक्रार


परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। महाडीबीटी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रमाणानुसार प्रत्येक लाभार्थ्याला 75 किलो हरभरा बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सावळी बुद्रुक येथील चार महिला शेतकर्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

महाडीबीटी योजनेंतर्गत हरभरा पिकाच्या बियाण्यांसाठी प्रत्येकी 75 किलो बियाणे मंजूर झाले असताना जिंतूर येथील गजानन फर्टिलायझर्स या विक्रेत्याकडून केवळ 60 किलो बियाणे देण्यात येत आहे. उर्वरित 15 किलो बियाणे हवे असल्यास 80 किलो बियाणे घ्यावे लागेल आणि अतिरिक्त पाच किलो बियाण्याचे प्रतिकिलो 100 रुपये याप्रमाणे पैसे द्यावे लागतील, अशी मागणी दुकानदाराकडून होत आहे. याप्रकरणी गयाबाई उत्तमराव घुगे, कमल ज्ञानदेव घुगे, लक्ष्मी हरिहर घुगे आणि सुमनबाई रामकिशन घुगे यांनी 30 ऑक्टोबर रोजी जिंतूर तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्याद्वारे, महाडीबीटी योजनेंतर्गत हरभरा बियाण्यांसाठी अर्ज केल्यानंतर प्रत्येकी 75 किलो बियाणे मंजूर झाले होते. त्यानुसार शासनाने निवड केलेल्या जिंतूर येथील गजानन फर्टिलायझर्स या विक्रेत्याकडे बियाणे घेण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचे तक्रारदार महिलांनी म्हटले आहे. मंजूर प्रमाणानुसार 75 किलो बियाणे देण्याची मागणी केली असता, दुकानदाराकडून 60 किंवा 80 किलो यापैकीच एक पर्याय स्वीकारण्यास सांगितले जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. 80 किलो बियाणे घेतल्यास अतिरिक्त पाच किलोचे प्रतिकिलो 100 रुपये याप्रमाणे पैसे द्यावे लागतील, असेही दुकानदाराने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकाराबाबत संबंधित महिलांनी जिंतूरच्या कृषी अधिकार्यांकडेही तक्रार केली होती. मात्र, तेथूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकर्यांची आर्थिक लूट होत असल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. महाडीबीटी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रमाणानुसार प्रत्येक लाभार्थ्याला 75 किलो हरभरा बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच संबंधित विक्रेत्याची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande