
सोलापूर, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।
शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आहेत की अपघातांना निमंत्रण देण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बहुतांश गतिरोधकांवरील पांढरे पट्टे पुसट झाले असून, काही ठिकाणी पट्टे मारण्यातच आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात गतिरोधक दिसत नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
सात रस्ता ते पत्रकार भवन मार्गावरील गतिरोधकावर दुचाकी आदळून एका शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गतिरोधकावरून दुचाकीस्वार उडून दोघे जखमी झाले. सलग घडलेल्या या घटनांमुळे शहरातील गतिरोधकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनांनंतर संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. ३) आंदोलन केले. शहरातील सर्व गतिरोधकांचे तातडीने ऑडिट करून ते नियमानुसार आहेत की नाहीत, याची तपासणी करावी, तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधकांवर स्पष्ट पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
गतिरोधकांची उंची, रस्त्यावरील त्यांची स्थिती आणि दृश्यमानता याबाबत आवश्यक निकषांचे पालन केले जाते की नाही, याची तपासणी करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना गतिरोधक स्पष्टपणे दिसावेत, यासाठी योग्य ती चिन्हे आणि रंगकाम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड