
पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।
शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता १० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. संचमान्यतेच्या प्रक्रियेत राज्यातील १ हजार ८९५ शाळांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्याने सुमारे ९० हजार ८४३ विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शाळांची संचमान्यता ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे आवश्यक शिक्षक पदे निश्चित करण्यासाठी महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यानुसार शिक्षकसंख्या, वेतन, पदांना मंजुरी तसेच शाळेचे प्रशासकीय नियोजन ठरते.
शाळांनी संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांच्या संचमान्यतेमध्ये अद्याप विविध त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांची पटनोंदणी करताना माहितीमध्ये त्रुटी राहिल्यास संबंधित विद्यार्थ्यांची नोंद संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. केवळ योग्य आणि पडताळणीयोग्य माहिती असलेल्या विद्यार्थ्यांचाच संचमान्यतेसाठी विचार केला जाणार असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांची माहिती तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या करणे आणि संचमान्यतेची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु