
अमरावती, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।
महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी अभियानात दर्यापूर तालुक्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तालुक्यात २० हजार ५०० महिला शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून राज्यात दहावा, तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दर्यापूर तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील येवदा गावानेही या मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली असून, येथे १ हजार ५०० पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्र हे संबंधित महिला शेतकरी असल्याचा अधिकृत पुरावा ठरणार आहे. या प्रमाणपत्रामुळे कृषी निविष्ठा, बियाणे, खते, कृषी कर्ज, पीकविमा, शासकीय अनुदान, बाजारपेठ तसेच साठवणूक सुविधांसाठी अर्ज करणे सुलभ होणार आहे.
१५ दिवसांत उपलब्ध होणार प्रमाणपत्र पात्र महिला ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात. त्यानंतर संबंधित ग्रामसभा किंवा नगरपंचायतच्या ठरावाद्वारे अर्जाची पडताळणी केली जाते. ठराव झाल्यानंतर १५ दिवसांत प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे. महिला शेतकऱ्यांनी स्वतःहून अर्ज केला नसला तरी ग्रामसभा स्वतःहून त्यांची पात्रता निश्चित करू शकते. त्यामुळे आगामी ग्रामसभांमध्ये पात्र महिलांची पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी