
अमरावती, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।
अचलपूर-परतवाडा जुळ्या शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. साचलेले पाणी, तुंबलेल्या गटारी, रस्त्यांच्या कडेला पडलेला कचरा आणि मोकळ्या भूखंडांवरील गाजरगवतामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जुळ्या शहरासह अचलपूर तालुक्यातील अनेक खुल्या भूखंडांवर गाजरगवत व रानटी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नव्याने विकसित होणाऱ्या वस्त्यांसह काही जुन्या वस्त्यांमध्येही सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी घाण पाणी साचत आहे. काही भागांतील गटारे आणि नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरत असून डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळ होताच अनेक वस्त्यांमध्ये डासांचा त्रास वाढत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सर्दी, ताप, खोकला यासारख्या आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमित धूरफवारणी आणि औषधफवारणी करण्याची मागणी होत आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केवळ धूरफवारणी न करता डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, गटारे वाहती ठेवणे, नाल्यांची नियमित साफसफाई, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि खुल्या भूखंडांवरील गाजरगवताचे निर्मूलन करण्याची गरज आहे. परिस्थितीनुसार दहा-पंधरा दिवसांतून एकदा धूर व आवश्यक औषधफवारणीचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी