

रायगड, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘चला शाळेत जाऊ या’ अभियानांतर्गत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी अलिबाग तालुक्यातील मुशेत, किहीम आदिवासी वाडी, झिराड, आवास आणि नवगाव येथील शाळांना भेट देऊन शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळांनी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी लेझिम आणि ढोलपथकाच्या गजरात शिक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. भुसे यांनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्याकडून वाचन करून घेतले आणि त्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट दिली.झिराड येथील शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेतील प्रयोगांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली. तसेच कला व कार्यानुभव प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. शाळांमधील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेले प्रयत्न समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांच्या भेटीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)