रायगड - मोबाईलवर गृहपाठ बंद; शाळांमध्ये एआय केंद्रे उभारणार
रायगड, 09 ऑक्टोबर (हिं.स.) : शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता ते रोजगारक्षम आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणारे असावे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहा
No more homework on mobile phones; AI centers to be set up in schools!


No more homework on mobile phones; AI centers to be set up in schools!


रायगड, 09 ऑक्टोबर (हिं.स.)

: शिक्षण केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता ते रोजगारक्षम आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणारे असावे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. अलिबाग येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘चला शाळेत जाऊ या’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांमधील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात आला.

मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली कमी होत असल्याने मोबाईलवर गृहपाठ देणे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे भुसे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायतींचा ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच ‘मिशन आरंभ’अंतर्गत पायाभूत साक्षरता, गणिती कौशल्ये आणि पाढे पाठांतरावर भर दिला जाणार आहे.

सरकारी शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि संरक्षक भिंती यांसारख्या सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शाळांच्या किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी निधी थेट मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त खात्यावर जमा केला जाईल. तसेच सीएसआर निधीतून वापरात नसलेल्या खोल्यांचे रूपांतर आधुनिक ग्रंथालये आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अध्ययन केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना आरोग्य कार्ड, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, ‘फुलराणी कक्ष’ आणि एचपीव्ही लसीकरणाची सुविधा देण्याचे नियोजन आहे. ‘मिशन अभय’अंतर्गत बालसुरक्षा, गुड टच-बॅड टच आणि सायबर सुरक्षेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande