
रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।
मतदारांचा मतदानाचा अधिकार आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेसने पुकारलेल्या ‘व्होट चोरी’विरोधातील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. रविवार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर हे आंदोलन आयोजित करण्यात आले.
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते ३० ऑक्टोबरपासून दिल्लीकडे रवाना झाले. रेल्वे, विमान आणि खासगी वाहनांद्वारे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतदारांचा अधिकार, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. रायगडमधील कार्यकर्त्यांमध्ये आंदोलनाबाबत उत्साह असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाढते वय आणि आरोग्यविषयक अडचणींमुळे दिल्लीला येणे शक्य नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होता आले नाही, तरी गावात आणि परिसरात समविचारी नागरिकांसह लोकशाही मार्गाने ‘व्होट चोरी’विरोधात आवाज उठवावा, असे त्यांनी म्हटले.
महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. त्याच धर्तीवर राहुल गांधी मतदारांचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी लढा देत असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. हे आंदोलन केवळ राजकीय नसून प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)